भंडारासह गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळात एकुण ७ वाघांच्या मृत्यूची नोंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : वाघाची पंढरी म्हणून राज्यात विदभार्ची ओळख आहे. मात्र, याच विदर्भात आता वाघांवर संकट ओढावले आहे. २०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या पाच जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांनी ७ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विदभार्तील वाघांच्या मृत्यूच्या आकड्यांवर लक्ष दिल्यास, २९ डिसेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यात शिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी शेतशिवारात वृध्दापकाळाने एक वाघ दगावला.

दुसरीकडे ६ जानेवारी रोजी एका वाघिणीचे तीन तुकडे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्रातील झंजेरिया जंगलात मिळून आले. त्यांनर लगेच दुसºया दिवशी ७ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीजवळ वाघाचे दात व नखे गायब असलेला अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला. पाठोपाठ ८ जानेवारी रोजी नागपूर प्रादेशिक वनविभागात उपासमारीने एका बछड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पोटात अन्न नसल्याचे यावेळी उघड झाले होते. तर १४ जानेवारी रोजी गोंदियाच्या भानपूर गावाजवळ एका वाघाचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर १९ जानेवारी रोजी पुन्हा चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला. वाघांच्या या मृत्यूसत्रामुळे वाघ मित्र व वन्यजीव प्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *