राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्राअंतर्गत गिरड सहवनक्षेत्रात समुद्रपूर-गिरड महामार्गावर धोंडगावजवळ पहाटेच्या सुमारास जड वाहनाच्या धडकेत चार महिन्याच्या मादी बछड्याचा मृत्यू झाला. तर पेंच व्याघ्रप्रकल्पातदेखील पश्चिम पेंचमध्ये नागलवाडी येथे आणखी एका वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली. मृत वाघ जवळजवळ कुजलेल्या अवस्थेत असल्याने पेंच प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या पहिल्या २२ दिवसात ११ वाघ मृत्युमुखी पडले आहेत.

यातील दोन वाघांची शिकार झाली. दोन बछडे उपासमारीने मृत पावले आहेत. दोन वाघांचे मृत्यू संशयास्पद आहेत. दोन वाघ रेल्वे आणि रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. रेल्वे अपघातात वाघाचा मृत्यू होऊन काही तास उमटत नाही तोच रस्ते अपघातात देखील वाघ मृत्युमुखी पडला आहे. वाघांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी असून यातील बरेच मृत्यू हे वनक्षेत्राच्या बाहेर आहेत. वाघांच्या शिकारीचा धोका या मृत्यूतून समोर आला आहेच, पण वनक्षेत्राबाहेरील व्यवस्थापनात खाते कमी पडत असल्याचेही यातून दिसून आले आहे. मृतदेह कुजल्यानंतर वाघाचे मृत्यू समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटन आणि तंत्रज्ञानावर भर देणाºया खात्याची क्षेत्रीय स्तरावरील पकड कमी होत असल्याचे देखील या मृत्युसत्राने स्पष्ट केले आहे. सेवानिवृत्त अधिकारी आणि वाघांच्या कॉरिडॉर, त्यांच्या संवर्धनावर काम करणाºया वन्यजीवप्रेमींनी देखील ही खंत बोलून दाखवली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *