भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुर- वठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांतील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांचा पाणी पुरवठा पाईपलाईन लिकेज झाल्याने १७ जानेवारीपासून ठप्प आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बनगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला बोरकन्हार येथे गळती लागल्याने पाइप दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. मंगळवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.
कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही अशा विविध कारणांमुळे बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही.