१५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : घर बांधकामासाठी लागणारा ना हकरत प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजाराची लाच घेताना पलाडी येथील महिला सरपंच व ग्रामसेवकास लाचलुचपतच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी भंडारा तालुक्यातील पलाडी येथे करण्यात आली. यात महिला सरपंच श्रीमती लता संदीप गोस्वामी (३६) यांना अटक रण्यात आली असून सहआरोपी ग्रामसेवक मिलिंद रुपदास जनबंधू (५४) यांना अटक व्हायची आहे. यातील तक्रारदार यांचे पलाडी, ता. भंडारा येथे गट क्र ०४ मध्ये असलेल्या जमिनीमध्ये त्यांना त्यांचे घराचे बांधकाम करायचे आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत पलाडी येथे नोव्हेंबर २०२४ मध्ये अर्ज केला होता. दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदार यांनी ग्रामपंचायत पलाडी येथील सरपंच लता गोस्वामी व ग्रामसेवक मिलिंद जनबंधू यांना बांधकामासाठी लागणारे ‘ना हरकत प्रमाण पत्र’ देणे बाबत बोलणी केली असता, त्यांनी तक्रारदार यांना ‘ना हरकत प्रमाण पत्र’ देण्याकरिता १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत लाचलुचपत विभागाने तक्रारदार यांचे तक्रारीवरून दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपींनी तडजोड अंती १५ हजार रुपयाची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान पलाडी येथील सरपंच श्रीमती लता गोस्वामी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून १५ हजार रुपये लाच रक्कम स्वत: स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस स्टेशन कारधा येथे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी सहआरोपी ग्रामसेवक मिलिंद जनबंधू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्यापही अटक रण्यात आले नाही.

सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधिक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधिक्षक सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात भंडाराचे पोलिस उपअधिक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांनी सापळा रचून पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया, पोहवा मिथुन चांदेवार, पोहवा अतुल मेश्राम, पोशि विष्णू वरठी, म.पो.शि अभिलाषागजभिये लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांच्या मदतीने तसेच कारवाई मदत पथक पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उप निरीक्षक संजय कुंजरकर, पोशि चेतन पोटे, मयूर सिंगणजूडे, पोहवा शिलपेंद्र मेश्राम, पोना नरेंद्र लाखडे, पोशि राहुल राऊत यांनी कारवाई केली. भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी स्वत: किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, भंडारा यांचेशी दुरध्वनी क्रमांक ०७१८४२५२६६१ यावर संपर्क साधावे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *