भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जवळच्या वरठी येथील सॅनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीतील ब्राईट बार विभागात झालेल्या अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले. सदर घटना आज सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. क्रेनच्या साहाय्याने साहित्य स्थलांतरित करण्याकरिता लावण्यात आलेल्या पुल्लिचे वायर तुटल्याने पुल्ली मजुरांच्या अंगावर पडल्याने सदर दुर्घटना घडली. कंत्राटी कामगार आशिष लिल्हारे व मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी बादल झंझाड हे सकाळपाळीत ब्राईट बार विभागात इलेक्ट्रिकलचे काम करीत होते.
या विभागात एका ठिकाणाहून दुसरीकडे वजनी सामान नेण्याकरिता क्रेनचा वापर होतो. इलेक्ट्रिकलचे कामात मग्न असताना अचानक साहित्य वाहून नेणाºया क्रेनच्या पुल्लिचे वायर तुटल्याने हुकासह पुल्ली मजुरांच्या अंगावर पडली. साधारण ७० ते ८० किलोची पुल्ली २० फूट अंतरावरून एका मजुराच्या डोक्यावर पडून सोबत काम करीत असलेल्या मजुराच्या पायावर आदळली. यात एका मजुराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही मजुरांचे पायाचे हाड मोडल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने अजूनही अधिकृत माहिती दिली नसल्याने परिसरात नानाविध चर्चा रंगल्या. दोन्ही जखमी मजुरांना तात्काळ कंपनी व्यवस्थापनाने भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी व सॅनफ्लॅग कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.