भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील मोडकडीस आलेली पोलीस वसाहत आंबट शौकिनांचा अड्डा ठरत असून यामुळे शाळकरी अल्पवयीन मुले या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण पसरले असून हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस स्टेशन शोभेची वस्तू ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. या पूर्वीही या वसाहतीत गांजा ओढणाºयावर कारवाही करण्यात आली होती. त्याच्याजवळून चिलम, गांजा जप्त करण्यात आला होता. मात्र सध्या त्या वसाहतीत शाळकरी अल्पवयीन विद्यार्थ्यांनी अमली पदार्थाचे सेवन करण्याचा अड्डा बनविल्याचे चित्र दिसत आहे. यात उच्चभ्रु गर्भ श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी भंडारा येथील एका नामांकित शाळेचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्याजवळ हा गांजा येतो कुठून हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे गांजा चा व्यसन पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या खिंडार पडलेल्या पोलीस वसाहतीत अनेक आंबट शौकीन युवक ही त्याच वसाहतीत दारू गांजा, सिगारेट यासारखे शौक पूर्ण करून आपली हौस भागवत आहेत. हा प्रकार एका नगरसेवकाने उघडकीस आणलेला असून त्या परिसरातील नागरिकांनी धावपळ करून अल्पवयीन विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले मात्र विद्यार्थ्यांचा भविष्य उध्वस्त होऊ नये याची दखल घेत त्यांना समज सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालकांनीही सजग राहून आपला पाल्य व्यसनाच्या आहारी जावून गुन्हेगारी प्रवूत्तीकडे तर जात नाही ना? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे गांजा येतो कुठून? अल्पवयीन विद्यार्थ्यांना गांजा उपलब्ध कसा होतो? याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.