भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या दौºयात भंडारा सिल्क उद्योग प्रा. लि., कान्हलगाव (ता. मोहाडी) आणि रेशीम मूलभूत सुविधा केंद्र, जमनी येथे भेट देऊन आॅटोमॅटिक रेलिंग युनिट आणि टसर व तुती रेशीम उद्योग केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना, उत्पादन प्रक्रियेसंबंधी माहिती आणि भविष्यातील संधी याविषयी अधिकाºयांकडून सविस्तर आढावा घेतला. ‘रेशीम शेती ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. हा उद्योग कृषी संलग्न असून, अल्पकालावधीत अधिक नफा मिळवून देणारा आणि रोजगार निर्मितीस चालना देणारा आहे,’ असे त्यांनी सांगितले. रेशीम उद्योग वाढीसाठी विशेष प्रयत्न भारतात रेशीम धाग्याची मागणी मोठी असली तरी उत्पादन अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
सध्या महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमध्ये तुती रेशीम उद्योग कार्यरत आहे, तर टसर रेशीम उद्योग पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने चालतो. यामुळे आदिवासी भागातील शेतकºयांना स्थिर उत्पन्नाचा उत्तम पर्याय उपलब्ध होत आहे. यावेळी आमदार कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, भंडारा सिल्क उद्योगाचे संचालक खेमचंद सोनकुसरे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपविभागीय अधिकारी बालपांडे, प्रभारी तहसीलदार एस. वाय. चांदेवार तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक मदत, शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीबाबत सकारात्मक धोरण राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या या दौºयामुळे भंडारा जिल्ह्यातील रेशीम उद्योगाला नवी गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.