भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेते व शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त रविवारी, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजता डी.बी.सायन्स कॉलेजच्या प्रांगणात सुवर्ण पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, उत्कृष्ट शेतकरी, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचाही गौरव करण्यात येणार आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सुवर्णपदक वितरण सोहळ्यात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्व. मनोहर भाई पटेल स्मारक समिती, गुजराती राष्ट्रीय केळवणी मंडळ आणि गोंदिया शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार तथा गोंदिया शैक्षणिक संस्थेचे सचिव श्री राजेंद्र जैन यांनी केले आहे.