भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : बौद्ध विहार समिती सिल्ली यांच्या वतीने ‘मिनी दिक्षाभुमी’चे अकरावे वर्धापन दिन तथा माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे भव्य आयोजन दि. ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत सिल्ली येथील बौध्द विहार परिसरात करण्यात आले. दि. ५ फेब्रुवारी रोजीचे उद्घाटन दुपारी १२ वाजता म. रा. प. महामंडळाचे कामगार अधिकारी पराग शंभरकर करतील, अध्यक्षस्थानी अशोक मोहरकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. लालचंद रामटेक, प्रशांत खोब्रागडे, से. नि.प्राचार्य अनमोल देशपांडे, से. नि. प्रा. दिगंबर रामटेके प्रामुख्याने उपस्थित राहतील. सायंकाळी ८ वाजता सप्त खंजरीवादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे संगीतमय प्रबोधन आयोजित केले आहे.
दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ वाजता डॉ. चंद्रकांत वाहाणे नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर घेतील. तर रात्रीला मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील. दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता सम्राट अशोका बुद्धिस्ट फेडरेशनतर्फे धम्म सकाळ कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे उद्घाटन जि. प. सदस्या अनिता भुरे तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चारूशीला मेश्राम, रत्नमाला चेटुले, सरपंच सुचिता पडोळे, तलाठी माधुरी ठवकर इत्यादी उपस्थित राहतील. रात्री ८ वाजता फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपतर्फे बुद्ध, भीम गीतांचा संगीतमय सामाजिक प्रबोधन सादर करतील. दि. ८ फेबु्रवारी रोजी दुपारी ३ ते रात्री ९ वाजतापर्यंत स्नेह भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे बौध्द विहार समितीने आवाहन केले आहे.