भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : बुकिंग पावती असूनही मागणी केलेले अधिकचे पैसे न दिल्याने ट्रक मध्ये वाळू भरून देण्यास इटगाव डेपोतील कर्मचाºयाने नकार दिल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली. त्यानंतर मात्र डेपो चालक नरमला व त्याने वरचे पैसे न घेता ट्रक मध्ये वाळू भरून दिली. शासनमान्य वाळू डेपोंमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या वाळूच्या दराच्या दुपटिपेक्षा अधिक रक्कम ग्राहक व मोटार मालक यांच्याकडून वसुल करण्यात येत आहे. महसूल व माइनिंग विभागाच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या लुटीमुळे मोटार मालक व ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डेपो चालकांच्या सुरु असलेल्या लूट व मनमानीचे असेच प्रकरण शुक्रवारी तहसील कार्यालयापर्यंत पोहचले. नागपूर येथील एका ग्राहकाने ३० जानेवारीला इटगाव डेपोमधून ५ ब्रास वाळू बुक केली. त्यासाठी डेपो व्यवस्थापन शुल्क, जिल्हा खनिज प्रतिष्ठान शुल्क व वाळूचे मिळून एकूण १० हजार ११० रुपये बुकिंग करते वेळी त्यांनी शासनाकडे आॅनलाईन जमा केले. वाळू भरून आनण्यासाठी भाड्याने ट्रक केला. शुक्रवारी दुपारी बुकिंग पावती घेऊन ट्रक चालक वाळू भरायला इटगाव डेपोमध्ये गेला. तेव्हा डेपोमधील कर्मचाºयाने नेहमीप्रमाणे ट्रक चालकाकडे प्रती ब्रास २ हजार ५०० रुपये प्रमाणे ५ ब्राससाठी १२ हजार ५०० रुपयांची मागणी केली.
हे अतिरिक्त पैसे देण्यास ट्रक चालकाने नकार दिला. त्यावर कर्मचाºयाने वाळू भरून मिळणार नसल्याचे सांगितले ववजन करण्यासाठी धर्मकाट्यावर लावलेला ट्रक मागे घ्यायला लावला. कर्मचाºयाच्या या मनमानी विषयी ट्रक चालकाकडून तहसीलदार महेंद्र सोनोने यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. डेपो चालकाकडून मागण्यात आलेल्या अतिरिक्त पैशासंबंधी सोनोने यांना माहिती देण्यात आली. सोनोने यांनी लगेच डेपो व्यवस्थापकाशी फोनवर संपर्क साधला व अतिरिक्त पैशाच्या मागणीचे कारण विचारत त्याची कानउघडणी केली. त्यानंतर मात्र डेपो चालक नरमला व अतिरिक्त पैसे न घेता त्याने ट्रक मध्ये वाळू भरून दिली. अशीच एक घटना शुक्रवारी लाखांदूर तालुक्यातील एका डेपोमध्ये सुद्धा घडल्याची माहिती आहे.