भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिल्ली : प्रज्ञा, शील, करुणा आणि समता या तत्त्वांच्या शिकवणूकीतून विश्वाला शांतीचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्धांनी जगाला जगण्याची एक सकारात्मक दिशा दाखवली. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी बुध्दाची शिकवण सर्वांनी अंगीकारावी यासाठी सिल्ली येथील ध्येय वेड्या बौद्ध अनुयायांनी मिनी दिक्षाभूमी उभारली आणि समाजाने न्याय, समता व ऐकतेचा मार्गान बुद्ध धम्माकडे चला, असा सामाजिक एकजुटीचा प्रतिबिंब म्हणजे सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमी होय. भंडारा तालुक्यातील सिल्ली गावातील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आंबेडकरी समाजावर बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव असून २०११ साली बौद्ध समाजाची एकजूट झाली आणि गावात नागपूरच्या दिक्षा भूमीची प्रतिकृती साकारण्याचे उघड्या डोळ्यांनी निळे स्वप्न पाहिले.
रात्र नि दिवस जीवापाड काबाड कष्ट केले, पैशाला पैसा जोडला आणि कोणाच्याही मदतीशिवाय लोकसहभागातून २०१४ साली सिल्लीसारख्या गावखेड्यात मिनी दिक्षाभूमीचा जन्म झाला असून आज ५ फेब्रुवारीला मिनी दिक्षाभूमी अकरा वर्षाची झाली. समाजातील महिला, पुरुष, लहान मुले, युवक तसेच वडिलधारी मंडळीनी ज्याला जमेल ते काम स्वत: करून दिक्षाभूमी साठी सर्वांनी श्रमदान केले. त्यामुळे श्रमदानाचे प्रतीक म्हणूनही दिक्षाभूमीचे नाव लौकिक आहे. मिनी दिक्षाभूमीच्या बौद्ध स्तुपाचे खास वैशिट्य म्हणजे स्तूपाच्या गाभाºयात महानिर्वाण मुद्रेतील तथागत बुद्धाची प्रतिमा अत्यंत आकर्षक आणि विलोभनीय आहे. त्यामुळे बुद्धाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी विदर्भाच्या कांना कोपºयातून लाखों अनुयायांची पाऊले सिल्लीच्या मिनी दिक्षाभूमीकडे वळतात. स्तूपाच्या उजव्या कोपºयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात भारतीय संविधानाचे पुस्तक असून समाजाच्या साºया समस्याचे उत्तर संविधानात असल्याचे सांगतात. त्यामुळे स्वाभिमानाने जगण्यासाठी संविधानाचे वाचन आणि जतन करण्याची प्रेरणा मिळते.
परिस्थितीचे दुखडे न सांगता संकटावर संयम आणि काटकसरीने मात करणाºया त्यागमुर्ती माता रमाईचा पूर्णकृती पुतळा महिलांसाठी प्रेरणादायी आणि वंदनीय आहे. ही दिक्षाभूमी केवळ वास्तूशिल्प नसून न्याय आणि समानतेचा विश्वास आहे. त्यामुळे पोटच्या पोरासारखे परिसराची स्वच्छता करण्यासाठी समाजातील महिला सरसावल्या. त्यामुळे अकरा वर्षानंतरही परिसर स्वच्छ आणि नीटनेटका दिसतो. त्यामुळे मिनी दिक्षाभूमीच्या प्रसन्न आणि रमणीय परिसरात माथा टेकवून जीवनाचे साफल्य झाल्याचा आनंद अनुयायांच्या चेहºयावर दिसत असून एकजुटीच्या कष्टाची पावती मिळाल्याचा गावाकºयांना समाधान वाटतो.