भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : गोंदिया जिल्ह्यातील अजुर्नी मोरगाव तालुक्यात येरंडी (देवलगाव) गावात जीबीएसचा संशयीत रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. १४ वर्षीय मुलगा आजाराच्या विळख्यात सापडला आहे. त्याच्यावर नागपूरातील एम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात १९ दिवसां पासून उपचार सुरू असल्याची माहिती आहे. जीबीएस आजारा बद्दल जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अन्नभिन्न असल्याचे दिसून येते. राज्यात गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराने डोके वर काढले आहे. पुणे जिल्ह्यात शेकडो रुग्ण बाधित असल्याची माहिती आहे. आता गोंदिया जिल्ह्यातही या आजाराचा संशयीत रुग्ण आढळला आहे. या आजामूळे हातापायाची ताकद जाऊन अंगलुळे पडण्याची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. बाधित अर्जुनीतील जीएमबी विद्यालय येथे आठव्या वर्गात शिकत आहे. त्याची प्रकृति बिघडल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात १८ जानेवारीला दाखल केले.
प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्याच दिवशी संधकाळी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथेही प्रकृतीत सुधारणा नसल्याने मध्यरात्री एकच्या सुमारास नागपूरला हलविले. खाजगी रुग्णालयात उपचारानंतर एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रक्त तपासणी नसाचे स्कॅनिंग कमरेतील पाण्याचे रिपोर्ट घेऊन तपासणी केली असता मुलाला जीबीएसचे लक्षण असल्याचे निदान झाले. यानंतरअतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बाधित जीवनरक्षक प्रणालीवर असल्याची माहिती आहे. येरंडी येथील मुलाच्या आजाराविषयी अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाद्वारे माहिती प्राप्त झाली आहे. गिळण्याचा व श्वसनाचा त्रास, दोन्ही पायात हालचाल नव्हती. नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे.