साकोली : लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे आयोजित शंकरपट पाहून परतत असताना महामार्गावर दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या धडकेनंतर अज्ञात ट्रकच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात प्रमोद जैराम कापगते (वय ३५, रा. कटंगधरा सासरा) यांचा मृत्यू झाला असून, भोजराम डोंगरवार (वय ६०, रा. घानोड बोरगाव) किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २:२७ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील जांभळी सडक येथे घडली. प्राप्त माहितीनुसार प्रमोद कापगते हीरो होंडा उऊ 100 रर ( ३५ ख ५86) दुचाकीवरून गावाकडे परतत असताना भोजराम डोंगरवार आपल्या ईव्ही मोटरसायकलने जात होते.
टी-पॉईंट परिसरात दोघांमध्ये अचानक टक्कर झाली आणि दोघेही रस्त्यावर पडले. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाºया अज्ञात ट्रकने प्रमोद कापगते यांना चिरडले, ज्यामुळे त्यांचा जागीचमृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटना स्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. जखमी भोजराम डोंगरवार यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, साकोली येथे दाखल करण्यात आले आहे. मृतक प्रमोद कापगते साकोली उपजिल्हा रुग्णालयात मजुरीचे काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली (वय ४ आणि २ वर्षे) आहेत.