भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नोकरीवर रुजू होण्याचे नियुक्तिपत्र त्याला मिळाले. तो अतिशय आनंदी होता. आनंदाने नियुक्तिपत्र घेऊन तो संबंधित कार्यालयात गेला. अधिकाºयाने नियुक्तिपत्र पाहताच त्याच्या पायाखालची वाळू सरकली. अर्थात त्याला मिळालेले नियुक्तिपत्र बोगस होते. नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आरोपींनी त्याची २८ लाखांनी फसवणूक केली. त्याने जरीपटका पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पृथ्वीराज साखरे (५२) रा. बुद्धनगर, मिलिंद कांबळे (४५) रा. गणेशपेठ आणि दीपक मोपट्टीवार (६४) रा. बेसा अशी आरोपींची नावे आहेत. मायानगर, इंदोरा येथील रहिवासी फिर्यादी देवदास जांभूळकर (६८) वेकोलिमध्ये नोकरीला होते. आठ वर्षांपूर्वीच ते निवृत्त झाले. त्यांना एक मुलगा आहे. विनीतचे बी. एस्सी.पर्यंत शिक्षण झाले आहे. तो नोकरीच्या शोधात होता. वडीलही त्याच्या नोकरीसाठी प्रयत्नशील होते. दरम्यान, त्यांना आरोपींबद्दल माहिती मिळाली की, ते पैसे घेऊन नोकरी लावून देतात. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची ओळख झाली.
आरोपींनी मोठमोठ्या थापा मारल्या. आमची चांगली ओळख आहे. राजकीय नेत्यांसोबत बैठक आहे. मंत्रालयातील अधिकारी ओळखीचे आहेत, अशी बतावणी करून विनीतला नोकरी लावून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. रेल्वे किंवा सामाजिक न्याय विभागात नोकरी लावून देण्यासाठी २८ लाख रुपयांत सौदा पक्का झाला. २०१८ ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आरोपींनी संपूर्ण रक्कम घेतली. मात्र, नोकरी मिळत नसल्याने फिर्यादीने तगादा लावला. अखेर त्यांनी एक बनावट नियुक्तिपत्र विनीतला दिले. त्याला मुंबईत सोबत घेऊन गेले. विनीतने संबंधित कार्यालयात जाऊन नियुक्तित्र दिले. अधिकाºयाने ते पत्र वाचताच विनीतच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतरही, आरोपींनी थापा मारल्या. नागपुरात परतल्यानंतर दुसरी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नोकरी काही मिळाली नाही. रक्कमही परत केली नाही. अखेर त्रस्त झालेल्या फियार्दीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.