आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प।

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे. सर्वसामान्य मध्यवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती वाढल्याने देशातील विकास झपाट्याने होण्यास हातभार लागणार आहे. देशातील १४० कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेण्याचे काम करतील असा विश्वास भाजपा प्रदेश प्रवक्त्या शिवानी दाणी वखरे यांनी व्यक्त केला. भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. नागरिकांची बचत वाढून नागरिकच देश- विकासाचे भागीदार कसे बनतील त्यादृष्टीने या अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिवानी दाणी वखरे म्हणाल्या की, शेतकरी, गरीब, महिला व युवा या विकसित भारताच्या चार प्रमुख स्तंभांना सक्षम करण्याचे काम अर्थसंकल्पाने केले आहे. सामाजिक क्षेत्र, लहान मुले आणि युवा शिक्षण, पोषण यासह आरोग्यापासून ते स्टार्ट अप्स आणि गुंतवणूक अशा प्रत्येक क्षेत्रातील तरतुदींमध्ये लक्षणीय भर टाकल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येते. अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकतावाढ आणि रोजगाराच्या संर्धीच्या वृद्धीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, मुलभूत सुविधा आणि नवोन्मेषासाठी गुंतवणूक क्षेत्र आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता आणि आर्थिक विकासासाठी निर्यात क्षेत्र या आर्थिक वाढीच्या प्रमुख चार चाकांवर लक्ष केंद्रीत करून त्यादिशेने अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. कर, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र, वीज आणि नियामक सुधारणा या ६ क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवानी दाणी वखरे म्हणाल्या की, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी ६ वर्षांची मोहीम, मखाणा बोर्ड, मत्स्य बोर्ड, फळं, भाजी उत्पादकांसाठी तसेच कापूस उत्पादक शेतकºयांसाठी विशेषयोजना तसेच युरिया आत्मनिर्भरता योजना या तरतुदींमुळे अन्नदात्याला अधिक बळ मिळणार आहे. पाच ‘नॅशनल सेंटर आॅफ एक्सलन्स’ ची स्थापना, भारतीय भाषा पुस्तक योजना, सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबैंड कनेक्टिव्हिटी, पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५० लाख अटल टिंकरिंग लॅब्स यासारख्या शिक्षण क्षेत्र विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे जागतिक दर्जाचे शिक्षण मिळून देशातील युवा अधिक सक्षम होतील असेही ते म्हणाले. देशाच्या उज्वल भविष्यासाठी मध्यमवर्गाला सक्षम करण्याची गरज लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मयार्दा ५० हजारावरून १ लाख, घरभाड्यातील टीडीएस मर्यादा २.४० लाख वरून ६ लाख यासारख्या तरतुदींमुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे.

सामाजिक विकासासोबतच या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शाश्वत आर्थिक विकास, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, एमएसएमई, निर्यात या आणि अशा अनेक क्षेत्रांसाठी महत्वपूर्ण तरतुदी आहेत. उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले असून एमएसएमई आणि लघु उद्योगांना बळकटी देण्यासाठी पावले उचलण्यात आली असल्याचेही शिवानी दाणी वखरे यांनी सांगितले.जन आरोग्य योजना, सक्षम आंगणवाडी व पोषण २.० कार्यक्रम, गिग वर्कर्सचे कल्याण, जलजीवन मिशन यासारख्या योजनांना बळकटी देत सामाजिक न्याय आणि जनकल्याणाकडेही लक्ष देण्यात आले आहे असे शिवानी दाणी वखरे म्हणाल्या. पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश प्रवक्त्या शिवानी दाणी, माजी खासदार सुनील मेंढे, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रकाश बळबुध्दे, डॉ. उल्हास फडके, जिल्हा महामंत्री आशु गोण्डाने, सचिन कुंभलकर, प्रशांत खोब्रागडे, प्रशांत निंबाळकर, चैतन्य उमाळकर, शैलेश मेश्राम आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *