भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव शिवारात जळालेल्या स्थितीत एका मुलीचे प्रेत १० फेब्रुवारी रोजी मिळाले होते. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे तिच्या जन्म दाखल्यावरून स्पष्ट झाले असून आरोपी नराधम शकील सिद्दीकीवर पोक्सो, अॅक्ट्रासीटी व इतर कलमे लावण्यात आली आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. आरोपी शकीलच्या वीट भट्टीवर मानेकसा येथील अल्पवयीन मृतक ही कामावर होती. दरम्यान शकीलने तिला प्रेम जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. यातच ती गर्भवती झाली. तिने शकीलला सोबत राहण्याची गळ घातली. यातच शकीलने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने तिचे प्रेत म्हसगाव शिवारात आणून जाळले. प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले. यावेळी मृताची पूर्ण माहिती मिळाली नसल्याने गोरेगाव पोलिसानी प्रमिला मानकर यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ३२८ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
आरोपी शकील सिद्दीकीला १० फेब्रुवारी रोजी ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे सांगीतले. तपासात मृतकाच्या आईने मृतकचे वय व जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याने व प्राप्त पुराव्यावरून मृतक १६ वर्षे ९ महिने वयाची, अनुसूचित जातीची असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी शकीलवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२)(एम), ९१, सहकलम ४, ६ लैंगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम- (पोक्सो), सह कलम ३ (२)(व्ही) अनुसूचित जाती जमाती कायदा अन्वये १२ फोब्रुवारी रोजी सदरहू कलमा लावण्यात आल्या. गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशात उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील करीत आहेत.