भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ( १६ फेब्रुवारी )रोजी धक्कादायक घटना घडली. कुख्यात गुन्हेगार कार्तिक चौबे (वय २८) याची शाहू गार्डन परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली. रोशन गायकवाड नावाच्या व्यक्तीने चाकूने वार करून त्याचा जीव घेतला. सक्करदरा पोलिसांना याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे, पोलिस उपनिरीक्षक संजय सिंग यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत,मृतदेह मेडिकलमध्ये पाठविला. माहितीनुसार, कार्तिक चौबे नुकताच तुरुंगातून सुटला होता आणि त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये सुरू केली होती. त्याने इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केल्याने त्याला तुरुंगात पाठविण्यात आले होते. घटनेच्या रात्री तो आपल्या काही मित्रांसोबत मद्यपान करत असताना त्याचा आणि रोशन गायकवाडचा वाद झाला.
रागाच्या भरात कार्तिकने रोशनच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली, त्यामुळे रोशन जखमी झाला. संतप्त झालेल्या रोशनने चाकू काढून कार्तिकच्या छातीत आणि पोटात अनेक वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.कार्तिकची आई, श्रीमती आरती उमेश चौबे (वय ५५), या गृह रुग्णसेवा पुरवठादार आणि नर्सरी शिक्ष्-ि ाका आहेत.मध्यरात्री १२:५० वाजता त्यांना शेजाºयांकडून फोन आला आणि त्यांच्या मुलाच्या दुखापतीची माहिती मिळाली. धावपळ करत त्या रुग्णालयात पोहोचल्या, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या मुलाचा निर्घृण खून झाल्याचे पाहून त्या कोसळल्या.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कार्तिक आणि रोशन यांच्यातील वाद अतिशय वाढला होता, ज्यामुळे हा प्राणघातक हल्ला झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी रोशन गायकवाड फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.या घटनेमुळे नागपूर शहरात पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारीप्रकरणी चिंता व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर वाढत चाललेल्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी कडक कारवाई करून शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.