भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज असलेले कॉग्रेसचे आमगाव-देवरीचे माजी आमदार सहेषराम कोरोटे यांनी काँग्रेसला बायबाय करून त्यांच्या समर्थकांसह देवरी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात शिवबंधन बांधणार असल्याचे सांगत शिवसेनेत सैनिक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
ते १८ फेब्रुवारी रोजी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते. पुढे कोरोटे म्हणाले, दहा वर्षे पक्षाशी एकानिष्ठ राहत क्षेत्रात पक्ष बळकट केला, कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. काँग्रेसला उभारी दिली, आपल्या कार्यकाळात कोट्यवधीचा निधी आणून अनेक विकास कामे केली. विधानसभा निवडणुकीत शेवटपर्यंत आपल्याला उमेदवारी निश्चित होती, मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाणीवपुर्वक तिकीट कापल्याचा आरोप त्यांनी केला. नव्या चेहºयाला संधी दिली. निवडणुकीत पक्षाला पराभव पत्कारावा लागला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक कल्याणकारी योजना आणल्या, सामान्य मानसाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या कार्यशैलीने आपण प्रभावित होत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कोरोटे यांनी सांगीतले.