भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आज (ता.१९) गोंदियात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मनोहर चौक, गोंदिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपविभगीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, न.प.मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. महेंद्र गजभिये यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. सदर पदयात्रा मनोहर चौक, गोंदिया येथून शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या तालात निघाली व जयस्तंभ चौक मार्गाने मार्गक्रमण करुन इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे या पदयात्रेची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिका- री कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊटगाईड व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा गजरात गोंदिया शहर दुमदुमले होते. सदर पदयात्रेत मनोहर म्युन्सीपल हायर सेकंडरी स्कुल, मारवाडी हायस्कुल, गर्ल्स हायस्कुल, गुरुनानक हायस्कुल, नूतन हायस्कुल, जे.एम. हायस्कुल, आदर्श सिंधी हायस्कुल, राजस्थान कन्या विद्यालय, मनोहर लोअर हायस्कुल, शारदा कॉन्व्हेंट स्कुल व ज्युनियर कॉलेज, सरस्वती हायस्कुल आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी या पदयात्रेत जवळपास १५०० शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे यांनी केले. कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक लांडे, क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी, जिल्हा संघटक (स्काऊट) पराग खुजे, जिल्हा संघटक (गाईड) चेतना ब्राम्हणकर, पदयात्रेत सहभागी सर्व शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद तसेच इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.