भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि कल्याणकारी राज्य चालविण्याचा आदर्श घालून देणारे व्यवस्थापन गुरू तसेच सक्षम प्रशासक म्हणून त्यांचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाºयांना त्यांची खरी जागा दाखवून दिली जाईल. राज्य त्यांना माफ करणार नाही, असे फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपतींना अभिवादन केल्यानंतर सांगितले.
शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केले नाही, तर राष्ट्राभिमानाची भावनाही प्रज्वलित केली, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रिद्वय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर पाळणा सोहळ्यासह शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर एक सक्षम प्रशासक होते . त्यांनी कल्याणकारी राज्य चालविण्याचा आदर्श ठेवला होता, असे फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज खºया अर्थाने व्यवस्थापन गुरू होते. शिवनेरीच्या भूमीवर पाय ठेवल्याने ‘स्वराज्या’ ची प्रेरणा मिळते आणि हीच भावना लोकांना या ठिकाणी वारंवार खेचते. जेव्हा अनेक राज्यांनी मुघल राजवट स्वीकारली, तेव्हा माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शोषण आणि जुलूम संपवून स्वराज्याच्या दिशेने मार्ग दाखविणारा नेता म्हणून कल्पना केली, असे ते म्हणाले.