तुमसर नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेमध्ये संगणमत करून गैरप्रकार केल्याचे उघड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषद कार्यालयाकडून विशिष्ठ नागरी सेवा निधी अंतर्गत शासनाचे ई-निविदा पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या निविदा क्रमांक २०२३ ऊटअ ८९६७०५२ बाबत प्राप्त निविदा घोटाळ्याच्या तक्रारीनुसार तपासणी करण्यात आली असून नगरपरिषद तुमसर कार्यालयातील बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकारी यांच्याशी संगणमत करून निविदा प्रक्रिया प्रभावित केल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक ही निविदा प्रकाशित करण्याची तारीख व निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक यामधील अंतर ८ दिवस इतके असणे आवश्यक होते व तसे ई-निविदा पोर्टलवरही असणे आवश्यक होते. परंतु मे. आनंद ठाकूर, मे. सर्वेश कन्सट्रकशन कंपनी, धनेशकुमार धावडे, गोंदिया या तिन्ही कंत्राटदारांनी व संबंधित बांधकाम अधिकारी यांनी संगणमत करून २१/०४/२०२३ रोजी सदर निविदा ६.५० स्रे ला प्रकाशित करून त्याच दिवशी ६.५५ स्रे ला समाप्त केली.

परंतु निविदा उघडण्याचा दिनांक ०२/०५/२०२३ असल्यामुळे या तांत्रिक बाबीचा गैरफायदा घेऊन २९/०४/२०२३ रोजी ०२.२७ स्रे ला शुद्धिपत्रक अपलोड करून निविदा समाप्तीचा दिनांक २९/०४/२०२३ ला ०३:०० स्रे पर्यंत करण्यात आला आणि याच ३२ मिनिटांमध्ये कंत्राटदार आनंद जी. ठाकूर, मे. सर्वेश कन्सट्रकशन कंपनी, धनेशकुमार पी. धावडे गोंदिया यांनी निविदा सादर केली असल्याचे दिसून येते. याबाबत अधिक तपासणी केली असता असे दिसून येते की, २९/०४/२०२३ रोजी संबंधित कंत्राटदारांनी नगरपरिषदेतील बांधकाम विभागातील तत्कालीन बांधकाम अधिकारी यांना हाताशी धरून एकाच संगणकावरून प्रथमता शुद्धिपत्रक प्रकाशित केले व त्याच संगणकावरून तिन्ही निविदा देखील सादर केल्या. सबब वरील प्रकारावरून असे दिसून आले की, कंत्राटदार आनंद जी. ठाकूर, मे. सर्वेश कन्सट्रकशन कंपनी, धनेशकुमार पी. धावडे गोंदिया नियमबाह्यरित्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून, शासनाची दिशाभूल व फसवणूक करून, इतर कंत्राटदारांना स्पर्धा करण्यापासून वंचित करून, निविदेबाबत असलेले शासन आदेश, नियम व कायद्याची पायमल्ली करून कामे मिळवलेली आहेत. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून कायदेशीर कारवाईस पात्र आहे.

त्यामुळे संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा ४८ तासाचे आत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा प्यारेवाले यांनी आपल्या समक्ष सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित कंत्राटदारांनी यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे लेखी म्हणणे नगरपालिका प्रशासनाला सादर केले नसल्यामुळे तत्कालीन बांधकाम अधिकारी आणि कंत्राटदार आनंद जी. ठाकूर, मे. सर्वेश कन्सट्रकशन कंपनी, धनेशकुमार पी. धावडे गोंदिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा प्यारेवाले यांनी दिले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता प्रशासनाचा कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *