भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील गिरोलाकोसमतोंडी या गावाच्या जंगल परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये पाच ते सहा वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली. गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट आणि वाघ आहेत. दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी-गिरोला मार्गावर वन्य प्राण्यांचा आवागमन नेहमीच सुरू असतो. आज एक बिबट रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात बिबट्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांना होताच आपल्या चमुसह घटनास्थळ गाठत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले आहे.
तर या वेळी घटनास्थळी प्रमोदकुमार पंचभाई, उपवनसंरक्षक गोंदिया, विनय जगदाणे, पशुवैद्यकिय अधिकारी, नवेगांवबांध, डॉ. मेघराज तुलावी, पशुवैद्यकिय अधिकारी, ठठळफ , जे. आर. जांभुळकर, नायब तहसिलदार, सडक अर्जुनी, मुकुंद धुर्वे, मानद वन्यजीव रक्षक गोंदिया जिल्हा, रुपेश निंबार्ते, संचालक, हिरवळ बहुउद्देशिय संस्था, गोंदिया तसेच संजीव दुधपचारे, पोलीस पाटील, गिरोला यांनी भेट दिली. सदर ठिकाणी समितीचे सर्व सदस्यांसह पशुचिकित्सक चमुकडून मृत बिबटचे शव विच्छेदन करण्यात आले, तसेच उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत नमुने पाठविण्याकरीता आवश्यक नमुने गोळा करण्यात आले. त्यानंतर सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत मृत बिबटचे शव संपूर्णत: जाळून नष्ट करण्यात आले. शवविच्छेदनाचे निरीक्षणानुसार सदर मादी बिबटचा मृत्यू हा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुखापत व छातीला जबर मार लागून आंतरिक रक्तस्वावामुळे झाले असल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.