भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मास्टर चावीने वाहन चोरी करून इंजिन आणि चेसिस नंबर बदलवायचे. लोकांना खोटी माहिती देत विक्री करीत होते. मिळालेल्या पैशावर आॅन लाईन जुगार आणि मनसोक्तपणे मजा करायचे. अशी कबुली वाहन चोरणाºया टोळीने दिली. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यांना अटक करून आतापर्यंत ६२ दुचाकी वाहनांसह एकूण २० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकाश खोब्रागडे (२५), आकाश परतेकी (२७), मयंक उर्फ क्रिश बारिक (१९), दीपक बिंजाडे (२४) आणि विजय उर्फ गोलू बिंजाडे (३४) सर्व रा. तुमसर, भंडारा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी भिलगाव आणि आॅटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून दोन वाहन चोरी झाले होते. यशोधरानगर पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाकडूनही या घटनांचा तपास सुरू होता.
पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यासाठी जवळपास २०० ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेºयांची फुटेज तपासले. अखेर आरोपी आकाश खोब्रागडेचा शोध लागला. पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते. पोलिस शिपाई राजू टाकळकर यांना आकाश महाराजबाग परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून आकाशला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळ दोन मास्टर चाव्या आणि मोबाईल मिळाला. चौकशीत त्याने आपल्या दोन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी त्या दोघांना तुमसर येथून अटक केली. वाहनांबाबत विचारपूस केली असता,आरोपींनी तुमसरच्या दीपक बाईक रिपेअरिंग गॅरेजचे मालक दीपक आणि विजय यांना सर्व वाहने विकल्याची माहिती दिली. तसेच दीपक आणि विजय वाहनांमध्ये फेरबदल करून भंडारा आणि आसपासच्या गावांत त्यांची विक्री करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. पोलिसांना गॅरेज पुढेच चोरीची काही वाहने मिळाली.