भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सासरा व साळ्याने जावयाचा खून केल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील दिपकनगर डव्वा येथे उघडकीस आली. गिरधारी भैय्यालाल कोटांगले (३३) रा. खांबा जांभळी ता. साकोली जि. भंडारा असे मृत जावयाचे नाव असून ओमप्रकाश राऊत (५५) व हुमेश ओमप्रकाश राऊत (२४) दोन्ही रा. डव्वा ता. सडक अर्जुनी अशी आरोपी सासरा व साळ्याचे नाव आहे. याप्रकरणी डूग्गीपार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार मृत गिरधारीची पत्नी गेल्या दोन वर्षांपासून डव्वा येथे माहेरी राहत आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी २२ फेबु्रवारी रोजी गिरधारी पत्नीला भेटण्यासाठी डव्वा येथे गेला. दरम्यान, संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गिरधारीचे सासरे आरोपी ओमप्रकाश व साळा हुमेश याने त्यांच्याशी वाद घातला.
यावेळी हुमेश याने रागाच्या भरात लोखंडी रॉडने गिरधारीच्या डोक्यावर मारले. यात तो गंभीर जखमी झाला, त्याला डव्वा येथील प्राथमीक आरोग्य केंद्र व नंतर येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात भर्ती केले. मात्र, उपचारादरम्यान, २३ फेबु्रवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमसास गिरधारीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गिरधारीचा भाऊ चरणदास भैय्यालाल कोटांगले (५८) रा. खांबा जांभळी ता. साकोली जि. भंडारा यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत.