भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महापुरुषांना जाती-पातीच्या चौकटीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या विचारांचा सर्वात मोठा अपमान आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि कृतीचा अंगीकार करून सशक्त राष्ट्रनिर्मिती करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिव व्याख्याते डॉ. नागेश गवळी यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व पारेषण कंपनी नागपूर परिमंडळ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू होते. तर, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि मधुकर घुमे यांनी अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाच्या घटना, त्यांचे प्रेरणादायी विचार आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी त्यांनी केलेला संघर्ष यावर डॉ. गवळी यांनी प्रकाश टाकला.
महाराजांच्या शौर्याची गाथा आणि त्यांच्या नेतृत्वाचे गुण विशद करून त्यांनी प्रकाश भवन परिसरातील उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष कोणत्याही एका जातीचे नव्हते. त्यांनी एकमेकांना पाहिले नसले, तरी ते विचारांनी एकरूप होते. छत्रपतींच्या समाधीचा शोध घेत त्याचे जीर्णोद्धार करायचे काम आणि महाराजांवरील पहिला पोवाडा रचायचे काम ज्योतीबांनी केले होते, तर दुसरा पोवाडा शाहीर अमर शेख यांनी केला होता. शिवरायांचा पोवाडा रशियाच्या चौकाचौकांतून गायचे काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केले होते.
“जय शिवराय” ही घोषणा देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. हे सर्व महापुरुष वेगवेगळ्या जाती धमार्तील होते, पण हे सर्व महापुरुष एका विचारांचे होते. त्यांनी कधीच जाती आधारित काम केले नाही, तर जातीपातीच्या भिंती त्यांनी पाडल्या. मानवतेचा पुरस्कार आणि समाजाला समतेचा विचार देण्याचे काम त्यांनी केले. परंतु, आम्ही आज त्यांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत बंदिस्त करतो आहोत, अशी खंत व्यक्त करीत डॉ. गवळी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती धर्मातील लोकांना जमा करून स्वराज्य निर्माण केले, पण त्यांना मात्र याच स्वराज्यातील काही लोकांनी जातीपुरते वाटून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आज आमच्यातून निघून गेले आहेत, पण त्यांचे विचार आजही तुमच्याआमच्यामध्ये जिवंत आहेत.
पण हा विचार आज केवळ पुस्तकातच बंदिस्त राहतो आहे की काय, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहायला लागला आहे. त्यांचे पुतळे आज आम्ही गावोगावी-चौकाचौकांत उभे केले आणि या चौकाचौकांतून आपण आपल्या महामानवांना वाटून घेण्याचे काम केल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, महामानवांच्या विचारांना या चौकटीबाहेर काढण्याची गरज आहे. इतर राजांनी कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही यांसारखी राज्ये आपल्या नावावर स्थापन केली. मात्र, शिवरायांनी भोसलेशाही न स्थापन करता रयतेचे स्वराज्य निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिताना शिवरायांच्या रयतेच्या राज्याचा आणि लोकप्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. या महाराष्ट्राचा इतिहास घोड्यांच्या टापाने, विजेच्या कडकडाटाने, ढगांच्या गडगडाटाने, सह्याद्रीच्या ढालीने, शाहीरांच्या टपाने, मावळ्यांच्या रक्ताने आणि छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने लिहिला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचे, संस्कारांचे अंगिकार करण्याचे आवाहन डॉ. गवळी यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र तिजारे यांनी, संचालन अमित पेढेकर यांनी, तर आभार प्रदर्शन सुभाष मुळे यांनी केले.