भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भारतात नालंदा,तक्षशिला या ज्ञान केंद्रात सात मजल्यांचे ग्रंथालय होते.पूर्वी शिक्षणासाठी पश्चिमेकडील विद्यार्थी भारताचे यायचे आता मात्र उलटा प्रवाह सुरू आहे. जुन्या काळात ग्रंथालयाचे महत्त्व माहित होते म्हणून संस्कृती नष्ट करण्यासाठी पहिला हल्ला भारतातील या ग्रंथालयांवरच केला गेला असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी केले. मुस्लिम लायब्ररी भंडारा येथील सभागृहात आयोजित दुसºया सार्वजनिक ग्रंथालय संमेलनाचे उद्घाटन अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह डॉ. इंद्रजीत ओरके यांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, नागपुरचे ग्रंथमित्र नंदू बनसोड,विदर्भ ग्रंथालय परिषदेचे अध्यक्ष वसंतराव मारवाडे, समन्वयक राजू मासुरकर,सचिव अशोक हुमणे, अस्तिक मस्के,शेषराव शिवनकर, विश्वनाथ बोदेले, डॉ.उज्ज्वला वंजा- री, सुरेंद्र बन्सोड,भैयाजी लांबट, वैरागडे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी विदर्भ सार्वजनिकग्रंथालय परिषदेच्यावतीने ‘ज्ञानसागर’ या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटक व प्रमुख वक्ते डॉ.इंद्रजीत ओरके यांनी वाचनाचे महत्त्व सांगून आज वाचनाला अवकळा आल्याचे सांगितले.राजू मासुरकर यांनी चळवळीला आता नव्या नेतृत्वाची गरज आहे असे सांगितले.ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी भंडारा जिल्ह्यातील ग्रंथालयांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात अत्यंत हिरिरीने भाग घेतल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून इंजि. ढोबळे म्हणाले स्विडन या देशाने प्राथमिक शाळेतील वाचनासाठी डिजिटल साधनांचा वापर बंद करून छापिल पुस्तकांचा वापर सुरू केला आहे. सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या आधारे ग्रंथालयाच्या उद्धाराचा विचार शासनाने सर्वप्रथम केला पाहिजे व शासनाने ग्रंथालयाला मदत केली पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन आकाशवाणीच्या उद्घोषिका विणा डोंगरवार यांनी केले. प्रास्ताविक प्रा.नरेश आंबिलकर यांनी तर आभार अशोक हुमणे यांनी मानले. या संमेलनात ग्रंथालयीन समस्येवर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र बुराडे हे होते. यात डॉ. सुरेश खोब्रागडे,प्रा.वर्षा मेश्राम ,सुधीर खोब्रागडे यांनी ग्रंथालयीन समस्या व उपाययोजना यावर आपले विचार मांडले. संमेलनाच्या शेवटी विविध ठराव पारित करण्यात आले. संमेलनाचे यशस्वीतेसाठी सौ.कुसुम कांबळे, भुपेश बारसागडे, तीर्थराज मेश्राम, रोशन उरकुडे, विलास गोंधुळे सौ.संगीता भोयर,सौ.राजश्री मासुरकर,भावनाताई बागडे यांनी अथक परिश्रम घेतले.