भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आज महाशिवरात्री निमित्त जिल्हाभरातील विविध महादेवाच्या मंदिरांमध्ये शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी करीत हर हर महादेव नामाचा गजर केला. महादेवाच्या सर्वच मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीमुळे जणू यात्राच भरल्याचे दिसून येत होते. भंडारा शहरातील बहिरंगेश्वर देवस्थान, छोटा महादेव म्हणून प्रसिध्द गायमुख, तुमसर तालुक्यात धुटेरा, राजापूर, जवाहरनगर जवळ झिरी, पवनी तालुक्यात कोरंभी, अड्याळ जवळ डोंगरमहादेव, लाखनी जवळ खुशीर्पार बांध, साकोली तालुक्यात उकारा शिवमंदिर, लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदीच्या काठावर असलेले उत्तर वाहिनी मंदिर अशा अनेक ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळपासूनच भक्तगण भालेनाथाचा गजर करीत महादेवाच्या मंदिराच्या दिशेने जाताना दिसत होते. लोकांनी महादेवाचे दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा परमेश्वराच्या कानी टाकल्या. प्रशासनही महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सतर्क होते. यात्रेच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सगळीकडे दिसत होता. तर विविध मंडळ, संघटनांकडून भाविकांना महाप्रसाद वितरण करताना पहावयास मिळाले.