भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : येथील ऐतिहासिक पांडे महलला आदिवासी वस्तु संग्रहालयात सामावून घेण्याच्या मागणी चे निवेदन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांना दिले आहे. ज्यावर ना. उइके यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की भंडारा जिल्ह्यातील ‘पांडे महल’ ही ऐतिहासिक वास्तू सन १८९६ मध्ये उभारली गेली असून, तिचे सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व अत्यंत लक्षणीय आहे. नागपूरकर राजे भोसले यांचे कर संकलक गणपतराव पांडे यांनी ही भव्य वास्तू उभारली होती. शीसम व बर्मा टीक लाकडापासून कोरलेले नक्षीकाम, ६ फूट व्यासाचे कोरीव खांब, राजस्थानी शैलीतील शिल्पकला, तसेच २० फूट उंच मुख्य प्रवेशद्वार ही या वास्तूची वैशिष्ट्ये आहेत. गेल्या १५० वर्षांपासून येथे सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात असून, हा उत्सव विदर्भाच्यासांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.
वास्तुशास्त्र आणि इतिहास प्रेमींसाठीही पांडे महल विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे आदिवासी संस्कृतीचे समृद्ध केंद्र आहेत, मात्र या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी भौतिक स्वरूपात पुरेशे प्रयत्न झालेले नाहीत. पांडे महलच्या भौगोलिक स्थानाचा विचार करता या ऐतिहासिक वास्तूचे ‘आदिवासी वस्तुसंग्रहालय’ म्हणून रूपांतर करणेयोग्य ठरेल. या संग्रहालयामुळे आदिवासी हस्तकला, पारंपरिक वस्त्रप्रकार, शस्त्रास्त्रे, वाद्ये आणि पूजासामग्रीचे जतन व प्रदर्शन होईल. आदिवासी लोककथांवर आधारित विशेष दालने निर्माण करता येतील, ज्यामुळे संशोधन व अभ्यासाला चालना मिळेल. स्थानिक आदिवासी कलाकार व हस्तकला व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध होईल, त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.
भंडारा जिल्ह्याचे एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व वाढेल. पांडे महलमध्ये आढळणाºया वैशिष्ट्यपूर्ण घटकांमध्ये १८ व्या शतकातील वास्तुशैली, मध्यभागी कारंजे, बेल्जियन टाईल्स, झुंबर, मोठे आरसे, कोरीव लाकडी प्रवेशद्वार, प्राण्यांच्या मुखवटे आणि हस्तनिर्मित खेळणी यांचा समावेश आहे. निवेदनात मागणी करण्यात अली की शासन निर्णय दि. २४ नोव्हेंबर २०१६, क्रमांक स्मारक २०१६/प्र.क्र. १३९/सां. का.3 नुसार, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्वस्थळे अधिनियम १९६० अंतर्गत पांडे महलला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी.