भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :- धूप अगरबत्तीच्या धुराने प्रभावित झालेल्या मधमाशांनी महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक शिवभक्तांवर हल्ला चढवीत चावा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज महाशिवरात्रीच्या दिवशी लाखांदूर चुलबंद नदी तीरावर असलेल्या सावरगाव महादेव मंदिरात घडली. या घटनेने येथील महादेव मंदिरात काही काळ शिवभक्तांमध्ये पळापळी झाली असून यात दहापेक्षा अधिक शिवभक्तांना मधमाशांनी जखमी केल्याची माहिती आहे. येथील सर्व जखमींना लाखांदूर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा लाखांदूर चुलबंद नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या महाशिवरात्रीचे औचित्य साधून सकाळपासूनच तालुक्यातील तथा परिसरातील शिवभक्तांची येथील महादेव मंदिरात पुजा अर्चा करण्यासाठी गर्दी उसळली आहे. पूजा अर्चा करण्यासाठी आलेल्या शिवभक्तांनी मंदिरात पूजा अर्चा करताना अगरबत्ती धूप पेटवल्याने त्याचा धूर मोठ्या प्रमाणात येथे झाला. दरम्यान महादेव मंदिरात आग्या प्रजातीच्या मधमाशांचा पुडका असल्याने या धूप अगरबत्तीचा धूर या मधमाशांच्या पुढक्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे या धुराने प्रभावित होऊन मधमाशा पूडका सोडून उडाल्या.
दरम्यान मधमाशा उडाल्या आणि उडालेल्या मधमाशांनी अनेक शिवभक्तांना चावा घेतल्याची माहिती पसरतात गर्दी केलेले शिवभक्त सैरावैरा जिकडेतिकडे पडू लागले. यात मधमाशांनी अनेकांना चावा घेतला असून दहापेक्षा अधिक शिवभक्त जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने या महादेव मंदिरात उपस्थित लाखांदूर पोलीस कर्मचाºयांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका बोलवून त्यातून जखमी शिवभक्तांना उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे येथील वैद्यकीय अधिकाºयाकडून सर्व जखमींवर उपचार सुरू आहे.