भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ग्राम पंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या जलशुध्दीकरण कामाचे बील मंजुर करण्याच्या मोबदल्यात कंत्राटदाराला ४० हजार रूपयांची लाच मागणाºया भंडारा जिल्हा परिषदेतील शाखा अभियंत्यास भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.सुहास पांडुरंग करंजेकर वय ५१ वर्षे असे लाचखोर शाखा अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार हे कंत्राटदार असुन त्यांनी तुमसर तालुक्यातील चिखली व लेंडेझरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामे पूर्ण केली. केलेल्या कामाचे ९ लाख ८० हजार रूपये किंमतीचे बिल मंजूरीसाठी तक्रारदार यांनी दोन्ही ग्रामपंचायत चे प्रमाणपत्र, वर्क आॅर्डर, कामाचे फोटोग्राफ व इतर आवश्यक कागदपत्रासह आरोपी सुहास पांडुरंग करंजेकर , प्रभारी उपअभियंता वर्ग -१ (यांत्रिकी ) यांत्रिकी उपविभाग, मूळ पद शाखा अभियंता वर्ग -२, जिल्हा परिषद भंडारा भंडारा यांच्याकडे सादर केले. दिनांक १७ फेब्रु. २५ रोजी तक्रारदार यांनी आरोपी यांची भेट घेत त्यांना सादर केलेल्या बिलाबाबत विचारणा केली असता आरोपींने बिलावर सही करून बिल मंजूर करण्यासाच्या मोबदल्यात बिलाच्या ५ टक्के रक्कम रुपये ४९ हजाराची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी या प्रकरणाची भंडारा लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दिनांक २५ फेब्रु. २०२५ रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता आरोपी सुहास पांडुरंग करंजेकर यांनी तक्रारदाराकडे तडजोड अंती ४० हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.तर आज दि.२८ फेब्रु. रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुहास कुरंजेकर यांनी तक्रारदार यांचेकडून ४० हजार रुपये लाच रक्कम स्वत: स्वीकारली. याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर चे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान,अपर पोलीस अधीक्षकसचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात ला.प्र. वि. भंडाराचे पो.उप.अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार , पो. हवा. अतुल मेश्राम, पो. हवा. मिथुन चांदेवार, पो. शि. विष्णू वरठी, पो. ना. नरेंद्र लाखडे, व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांनी केली.