भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातून गोंदियाच्या दिशेने येणाºया एका ट्रकला शुक्रवारी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना सालेकसा तालुक्यातील नवाटोला येथे घडली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून सालेकसा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ दाखल होण्यापूर्वी सालेकसा नगर पंचायतीच्या अग्रिशमन दलाला पोलिसांनी माहिती दिली असता अग्नि शमनचे बंब वेळेवर पोहोचले असल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी आदि झाली नाही. मात्र ट्रक क्रमांक एम.एच.४९ बी-८१०१ मध्ये असलेल्या सुमारे ३०० पोती पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल व्ह्यक्सची संपूर्ण राख रांगोळी झाली. ट्रकला लागलेली आग इतकी भीषण होती की लागलेल्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्या करिता सालेकसा आणि आमगाव येथील अग्नीशमन विभागातील कर्मचाºयांना दोन तासाची कसरत करावी लागली. दरम्यान या मार्गावर वाहतूक तीन तासापर्यंत खोळंबली होती.
ट्रक ला लागलेली संपूर्ण आग विझल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या सालेकसा पोलीसांनी ट्रकची आग विझवल्यानंतर ट्रक चालक मालक लिल्हारे यांना घटनेसंदर्भात विचारपुस केली असता ट्रक सालेकसा तालुक्यातील नवाटोला येथे पोहोचताच ट्रकचा मागील टायर पंचर झाल्याने ट्रकचालकांनी ट्रक रस्त्याच्या कडेवर थांबविला असता टायर ब्लास्ट झाला आणि ट्रकला अचानक आग लागली असल्याचे सांगितले या ट्रक मध्ये गोंदिया येथील उज्वल ट्रेडींग कंपनीचे पशुखाद्य निर्मितीचे साहित्य व्ह्यक्स ट्रकमध्ये असल्याचे ट्रकचालक लिल्हारे यांनी सालेकसा पोलीसांनी सांगितले. या ट्रकला लागलेल्या आगी प्रकरणाची नोंद सालेकसा पोलीसांनी केली आहे. पुढील तपास सालेकसाचे पोलीस निरिक्षक भुषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात केली जात आहे.