आंतरजातीय विवाहामुळे भंडाºयात तणाव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलासोबत दोन दिवसांपूर्वी विवाह केला. विवाहानंतर दोघे गोंदिया येथे गेले. मात्र या विवाहाची माहिती मिळताच काही सामाजिक संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत दि.२७ फेब्रु च्या रात्री १० वाजेपासुन भंडारा पोलीस स्टेशनला घेराव केल्याने भंडारा पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मुलाला आणि मुलीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. मुलाचा इन कॅमेरा बयान नोंदवून पोलिसांनी शिताफीने हे प्रकरण हाताळले आणि आक्रमक झालेल्या जमावाला शांत करीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील यादृष्टीने कारवाई केली. प्रकरण निवळले असले तरी शहरात तणावपुर्ण शांतता दिसुन येत आहे. भंडारा शहरातील २२ वर्षीय हिंदू तरुणी आणि २४ वर्षीय मुस्लिम तरुणाचे एकमेकांवर प्रेम जडले.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली ही तरुणी एका शिकवणी वर्गात संगणक आॅपरेट म्हणून काम करते तर तरुण अल्पशिक्षित असून त्याचा शहरात कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे. मागील सात वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी मुलीच्या घरी त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती झाले मात्र ते लग्न करतील असे घरच्यांना वाटले नाही त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या या तरुण जोडप्याने सात वर्षांच्या प्रेम संबंधांनंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला. १५ दिवसांपूर्वी मुलीला लग्नासाठी स्थळ आणि निरोप येऊ लागले. आता घरचे आपले लग्न दुसºया कुठल्यातरी मुलाशी करून देतील या विचाराने या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी रोजी भंडारा शहरातील एका मस्जीदमध्ये हे दोघे काही मित्रांसह पोहचले. मस्जिदचे धर्मगुरू यांनी या दोघांचा ‘निकाह’ लावून दिला आणि मस्जिद ट्रस्टच्या वतीने ‘निकाह प्रमाणपत्र’ देण्यात आले. यावेळी मुलीकडून कुणीही नसून मुलाकडून त्याच्या तीन मित्रांनी या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली.

विशेष म्हणजे त्याच वेळी मुलीने तिचे हिंदू नाव बदलून विवाह प्रमाणपत्रात मुस्लिम नाव लिहिले. लग्नानंतर दोघेही भंडारा पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मस्जिदमध्ये लग्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघे गोंदिया येथे गेले. मात्र त्यांच्या विवाहाची माहिती मिळताच मुलीच्या घरच्यांनी त्यांच्या काही नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर या प्रकरणाला हिंदू – मुस्लिम विवाह असे आंतर धार्मिक वळण आले आणि शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी याला कडाडून विरोध केला. दि.२७ फेब्रु. राजी काल रात्री दहा-अकरा वाजेच्या दरम्यान भंडारा पोलीस ठाण्यात आक्रमक झालेले हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोहचले. मुलीचे अपहरण करून बळजबरी लग्न केले असल्याचे सांगून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरण्यात आली. अखेर रात्री मुस्लिम मुलाच्या विरोधात कलम ३६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या नवविवाहित जोडप्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले.

आज सकाळी पोलीस ठाण्यात विवाहित हिंदू मुलीचे समुपदेशन करण्यात आले आणि इन कॅमेरा बयान नोंदविण्यात आला. त्यावेळी तिने ‘लग्न स्वेच्छेने केले’ असल्याची कबुली दिली. या सर्व प्रकारानंतर मुलीला तिच्या इच्छेने माहेरी पाठ- विण्यात आले. मुलगी राहण्यास तयार नसेल तर तिला कोणतीही बळजबरी नसल्याची भूमिका मुलाच्या घरच्यांनी घेतली. अखेर दुपारी १ वाजता शांततेत हे प्रकरण निवळले. काही हिंदुत्ववादी संघटनानी आज सकाळपासून समाज माध्यमांवर पोस्ट टाकून पोलीस ठाण्यात जमण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. दुपारी १२ वाजता दरम्यान भंडारा पोलीस ठाण्यात हिंदूत्ववादी संघटना, लोकप्रतिनिधी, माजी खासदार सुनील मेंढे, सामाजिक संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असे शेकडोंच्या संख्येने लोक जमा झाले. पोलीस ठाण्याच्या परिसरात नारेबाजीही करण्यात आली. यावेळी ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *