भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे भेट देऊन येथील दुर्मीळ ग्रंथाचे वाचन केले. खासदार प्रफुल पटेल यांचा अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतांना त्यांनी सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे भेट दिली. सार्वजनिक वाचनालयाच्या दुर्मीळ ग्रंथ कक्षाची पाहणी केली. ग्रंथालयातील सन १२९८ चा सर्वात दुर्मीळ ग्रंथ ‘किताब ठहरावस दरदफ्तर’ मागून घेतला.ग्रंथालयाच्या तळमजला सभागृहात जवळपास वीस मिनिटे या ग्रंथाचे वाचन केले.विशेष म्हणजे या ग्रंथात भंडारा, तुमसर, गोंदिया, पवनी आणि अन्य गावांचा उल्लेख असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. या प्रसंगी वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, कार्यवाह डॉ.जयंत आठवले, तुमसरचे आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खा. प्रफुल पटेल यांच्याकडून दुर्मीळ ग्रंथाचे वाचन
