भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : प्रत्येक क्षेत्रात कर्तुत्वाच्या बळावर महिला प्रशासकीय सेवेत विराजमान झाल्या आहेत. अनेक महिला अधिकारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यात नव्याने प्राजक्ता बुरांडे यांची पहिल्या नियमित तहसीलदार म्हणून मोहाडीच्या इतिहासात नोंद झाली आहे. नियमित तहसीलदार म्हणून तालुक्याच्या महत्त्वपूर्ण पदावर प्रशासनाची दोरी महिलेच्या हाती येण्यासाठी मोहाडीला चार दशकाची प्रतीक्षा करावी लागली. मोहाडी तहसील कार्यालय आता नव्या रूपात दिसू लागली आहे. प्रशासकीय इमारतीत विविध शासकीय कार्यालय आली आहेत. जनतेला आपले काम करणे सोपे झाले आहे.
शासनाचे दृश्यरूप तहसीलदार असतो. अशा नव्या रूपात प्रशासकीय इमारतीमध्ये नव्याने रुजू झालेल्या नियमित तहसीलदार म्हणून प्राजक्ता बुरांडे पहिल्या महिला अधिकारी आहेत. १९८१ ते २०२५ या ४४ वर्षाच्या कार्यकाळात हे काही महिला नेहमी तहसीलदार म्हणून आल्या नाहीत. मात्र नायब तहसीलदार असलेल्या अल्का शिंगाडे (तुमसर) यांनी दोन वर्ष तहसीलदार पदाचे प्रशासन सांभाळले होते.मोहाडी तहसीलने अनेक चांगले अधिकारी बघितले आहेत. त्यात पी. आर.कुलकर्णी, ना.सी.कातोरे, आनंद पुद्दटवार, वसंत धकाते, मनोहर वि.पोटे, विजय बोरुडे(शिरडी), कल्याणकुमार डहाट, सूर्यकांत पाटील, मीनल करणवाल, दीपक कारंडे यांचे प्रशासन उल्लेखनीय राहिले. मात्र,सिरसोली येथील घर पाडण्याच्या प्रकरणात धनंजय देशमुख यांच्या कार्यकाळ वादग्रस्त राहिला होता.