भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गावातील पशुपालकांच्या अंगणामध्ये बांधून बांधलेल्या तब्बल पाच गायी एकाच रात्री अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना भंडारा शहरालगतच्या खोकरला ग्रामपंचायत येथे ४ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गाय चोरीचा हा प्रकार ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणीपशुपालक तथा ग्रामपंचायत पदाधिका-यांकडून करण्यात आली आहे. पांढ-या रंगाच्या इनोवा कारमध्ये आलेल्या तीन ते चार चोरटयांनी खोकरला येथील पशुपालक भारत महादेव रोकडे व बाबुराव पाटेकर यांची प्रत्येकी १ गाय तसेच मंगेश श्रीराम ढेंगे यांच्या अंगणातून २ सहवाल जातीच्या दुभत्या गाई व १ खिल्लारी जातीचा गोरा चोरून नेल्या. फिर्यादी मंगेश श्रीराम ढेंगे (३५) रा.खातरोड खोकरला यांच्या वडीलांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी आपल्या घरच्या गुरांना चरवून आणल्यानंतर अंगणामध्ये बांधले होते.
रात्री २ वाजताच्या सुमारास वडील बाथरूमकरिता उठले असता त्यांनी अंगणातील गायींकडे जावूनपाहिले असता त्यांना दोन साहीवाल जातीच्या लाल गायी व खिल्लरी जातीचा काळ्या रंगाचा गोरा दिसून आला नाही. त्यामुळे लगेच मुलाल उठवून सांगितले. यावेळी त्यांनी आजूबाजूला पाहिले असता अंगणातील शेणावरून कारचे चाक गेल्याचे दिसून आले. त्यामुळे गायी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये पांढ-या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये तीन ते चार चोरटे आल्याचे व गाय चोरून नेत असल्याचे दिसून आले. गोवंश चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी पशुपालकांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तातडीने कारवाई करून चोरट्यांना अटक करावी अशी मागणी पशुपालक यांनी केली. तब्बल पाच गोवंश एकाच वेळी चोरीच्या या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.