भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यभर उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून, नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्चच्या सुरुवातीला थोडीशी गारवा देणारी हवा होती, मात्र आता पुन्हा तापमानात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: कोकण व गोवा विभागात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या भागांतही उष्णतेचा कहर दिसून येतो आहे.न् विदर्भातील भंडारा,नागपुर येथे देखील उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरीक हैराण झाले आहे. भंडाºयातदिवसा कमाल तापमान ३४ व रात्री २४ तर नागपुरात दिवसाचे कमाल तापमान सुमारे 3६ अंश तर रात्री यात २३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होऊन किमान तापमान १४ पर्यंत नोंदवले जात आहे. त्यामुळे काही तासांमध्येच तापमानाच्यामोठ्या फरकाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दुपारी कूलर किंवा एसीचा वापर करावा लागत आहे तर रात्री साधा पंखा पुरेसा ठरत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १४ मार्चपर्यंत शहराचे कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पारा ४० च्या पुढेही जाऊ शकतो. किमान तापमानही १७ ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच महाराष्ट्रात तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेले होते. त्यानंतर काही प्रमाणात घट झाली असली, तरीही आता पुन्हा तापमान वाढू लागले आहे. राज्यातील अनेक भागांत पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.भारतीय हवामान विभागानुसार पुढील पाच दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ११ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून त्यानंतरही उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.