महाराष्ट्र सरकारच्या १० मार्च २०२५ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ नवीन घोषणांचा बाजार असून, प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या हाती काहीच लागणार नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने महायुतीतील सर्व पक्ष विसरले आहेत. जनता आता या महायुती सरकारला धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी दिली. खा.पडोळे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यात आलेले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर प्रचारादरम्यान दीड हजार, दोन हजार, अडीच हजार, तीन हजार अशा टप्प्यामध्ये अनुदान वाढवण्याची घोषणा करून टाळ्या घेतल्या होत्या. मात्र, या अर्थसंकल्पात वाढीव रकमेचा उल्लेखही नाही. पुढील काळात हे सरकार हे अनुदानच बंद करेल, तर आश्चर्य वाटू नये.
महायुती सरकारला निवडणुकीतील आश्वासनांचा विसर – खा.डॉ.प्रशांत पडोळे
