भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे आयोजित परमात्मा एक सेवक मानव धर्माच्या सेवक सम्मेलनात अन्न व पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश असून सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले आहे. सुकळी (दे) येथे दोन दिवसांपूर्वी परमात्मा एक सेवक मानव धमार्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संध्याकाळी उपस्थित सेवकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच, काही लोकांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या पाणीपुरी विक्रेत्यांकडून पाणीपुरी घेतली.
या अन्न व पाणीपुरीमुळे अनेकांना उलटी, हगवण व अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. यानंतर २२ रुग्णांना बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर सात-आठ रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.याशिवाय रोहा, आंधळगाव, जांब व कांद्री येथील सात-आठ जणांनाही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने तातडीने गावात येऊन तपासणी केली. सभापती नरेश ईश्वरकर यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. तसेच, डॉ. व्ही.आर. रहांगडाले (देव्हाडी आरोग्य केंद्र) व डॉ. मिरज शेख (बेटाळा आरोग्य केंद्र) यांनीही रुग्णांची तपासणी केली.विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना योग्य ते उपचार मिळाले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.