भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ सरकारने विविध योजनेतील लाभार्थींना थेट अनुदान बँकेत ट्रान्सफर (महाडीबीटी ) करीता केवायसीची अट घातली असुन त्याकरीता आवश्यक ती कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करण्याचे फरमान सोडले आहे.मात्र लाभार्थ्यांना केवायसी करण्या करीता अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन त्यांना मोठया प्रमाणात शारिरिक व मानसिक त्रासाला समोर जावे लागत आहे. त्यासंदर्भात माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज मोहाडी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री.चांदेवार यांची भेट घेत महाडीबीटी च्या नावाखाली शासनाने लाभार्थ्यांची अडवणुक करू नये अशी मागणी केली. प्रत्येक गावात शिबीर लावुन लाभार्थ्यांची कागदपत्रे गाळा करण्यात यावी किंवा शासनाने प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जावुन आवश्यक ती कागदपत्रे गोळा करावी अशी मागणीसुध्दा चरण वाघमारे यांनी यावेळी केली.
शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, या योजनेतील लाभार्थी विविध जटिल रोगाने ग्रस्त आहे, दिव्यांग आहे तर काही वृद्ध असल्याने ते अंथरुणातून उठू शकत नाही. अशी दयनीय अवस्था असतांना त्यांच्या शारीरिक अवस्थेकडे दुर्लक्ष करून थेट रखरखत्या उन्हात तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देणे हे आजच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय असे कृत्य आहे. उलट प्रत्येकगावात ग्रामपंचायती च्या माध्यमातून शिबीर लावून किंवा निवडणुकीत घरी जाऊन वयोवृद्ध मतदारांचे मूल्यवान मत घेण्यासाठी निवडणूक आयोग ज्याप्रकारे घरापर्यंत पोहोचले होते. तसेच या योजनेतील लाभार्थींच्या केवायसी ला लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी गावातच पोहोचून निराधार, दिव्यांग व वृद्ध लाभार्थींना दिलासा देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे. आज मोहाडी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री. चांदेवार यांची भेट घेवुन निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना होणाºया त्रासाबद्दल चर्चा करीत तहसीलदार मोहाडी यांच्यामार्फत तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची मागणी केली. शासनाने लोकाभिमुख शासन करावे. लोकांना आपल्याभोवती फिरवू नये असा सल्ला सुद्धा यावेळी चरण वाघमारे यांनी दिला. याप्रसंगी हंसराज आगाशे, माजी सरपंच अंकुश दमाहे, राजेश निंबार्ते, तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.