भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सुरक्षा व आवश्यक साहित्याची किट असलेली पेटी तसेच घरगुती वापराचे भांडे असलेले डिनर सेट चे वाटप केले जात आहे. मात्र या वाटपात कुठलेही नियोजन नसल्याने मोठया प्रमाणात गोंधळ दिसुन येत आहे. तसाच गोंधळ निर्माण झाल्याने आज सकाळी संतप्त महिला कामगारांनी बेला येथे भंडारा- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कामगार शांत झाले.
विशेष म्हणजे बेला येथील सचिन सेलीब्रेशन सभागृहात कामगारांना पेटी वाटप करण्यात येते मात्र मागील तिन-चार दिवसापासुन येथे पेटीवाटप बंद करण्यात आले आहे मात्र पेटीवाटप किती दिवस बंद राहणार व कधीसुरू होणार याचे सुचनाफलक लावण्यात आलेले नाही.त्यामुळे दररोज शेकडो कामगार येथे पेटी घेण्याकरीता येत असतात मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.अखेर आज महिला कामगारांचा संयमाचा बांध फुटला व त्यांनी राष्टÑीय महामार्ग रोखुन धरला. महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने कामगारांना सुरक्षा साहित्य असलेल्या किटचे वाटप केले जात आहे.किटवाटपाचे काम एका खासगी कंपनीला आहे.
बेला येथील एका लॉनमध्ये हे वाटप होणार होते. मागील आठ दिवसांपासून कामगारांना पेटी वाटपसाठी तारीख दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातून लांबून लांबून कामगार पेटी साठी येथे येतात. मात्र प्रत्येक वेळी आज नाही उद्या मिळणार असे सांगून त्यांना परत पाठवले जाते. त्यामुळे या कामगारांचा वेळ आणि ये जा करण्याचे पैसेच वाया जात नाही आहेत तर त्यांची रोजी देखील बुडत आहे. अनेक कामगार रोजी बुडवून येत आहेत त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, या कामगारांना १७ तारखेला पेटी वाटप होईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे रात्रीपासूनच अनेक कामगारांनी बेला येथील या लॉनपुढे तळ ठोकला.
लाखांदूर पालांदुर ही गावे दूर पडत असल्याने रात्रीच कामगार या ठिकाणी मुक्कामी आले. मात्र सकाळी १० वाजता त्यांना आज पेटी वाटप होणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतील. शेकडो संतप्त महिला राष्ट्रीय महामार्गावर येऊन बसल्या आणि घोषणाबाजी करू लागल्या. आठ दिवसांपासून नोंदणीकृत बांधकाम कामगार किट मिळवण्यासाठी उन्हात तन्हात ताटकळत उभे राहत आहेत. दिवसभर वाट पाहून कामगारांना पेटीविना आल्या पावली परतावे लागत असल्याने येथील कामगार संतप्त झाले. जिल्ह्यातील हजारो पेटीसाठी कामगारांनी नोंदणी केली आहे.