भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : बाजारातून कोणतीही वस्तु खरेदी करतांना आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी आपले अधिकार व हक्काबाबत नेहमी जागरुक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य संजय जोशी यांनी केले. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे आज (ता.१८) गोरेगाव तालुक्यातील शहारवाणी येथे आयोजित ‘जागतिक ग्राहक दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजय शिंदे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले, सहायक जिल्हा माहिती अधिकारी कैलाश गजभिये, अखिल भारतीय ग्राहक मंचच्या सल्लागार कविता लिचडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सुरज नशिने मंचावर उपस्थित होते.
संजय जोशी म्हणाले, ‘जागतिक ग्राहक दिन’ दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो. ग्राहकांचे हक्क आणि गरजांबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी जागतिक ग्राहक दिनाची ‘शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय्य संक्रमण’अशी संकल्पना आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांच्या हिताकरीता ग्राहक संरक्षण कायदा २०१९ तयार करण्यात आलेला आहे. नागरिकांनी कोणताही व्यवहार करतांना किंवा सेवा घेतांना बील घेणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपली फसवणूक झाल्यास संबंधीत प्राधिकरणाविरुध्द तक्रार दाखल करणे नागरिकांना सोईचे होईल. बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करतांना ग्राहकांनी दुकानदाराला बील मागणे हे आपले कर्तव्य आहे. शाळा व महाविद्यालयात ग्राहकांच्या हक्काबाबत जनजागृती करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करुन प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
संजय शिंदे म्हणाले, ग्राहक हितासाठी अनेक कायदे असून ग्राहक हा राजा आहे. अन्न व औषध याबाबत ग्राहकांनी विशेष दक्षता घ्यावी. पॅकींग अन्न पदार्थ खरेदी करतांना त्या पॅकींगवर उत्पादन दिनांक, सदर अन्न पदार्थ हा किती दिवसापर्यंत खाण्यास योग्य आहे याची माहिती पडताळून अन्न पदार्थ व औषधे घ्यावीत. अन्नपदार्थ/औषधे घेतांना दुकानदाराकडून बील घ्यावे. अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबद्दल काही तक्रार असल्यास ाँिङ्मल्ल्िरं@ॅें्र’.ूङ्मे यावर तक्रार करावी असे त्यांनी सांगितले. कैलाश गजभिये म्हणाले, ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क याबाबत सदैव जागरुक राहावे. वाजवी किंमत आणि शुध्दता याग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे.
या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करु शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. सुरक्षेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, मत मांडण्याचा हक्क, तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क, ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा अधिकार असे ग्राहकांच्या हिताकरीता विविध अधिकार तयार करण्यात आलेले आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक मंचच्या सल्लागार कविता लिचडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सुरज नशिने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रम स्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात बी.पी., शुगर, सिकलसेल व इतर आजाराची नि:शुल्क तपासणी करुन औषधोपचार करण्यात आला. सदर आरोग्य शिबिरात शहारवाणी ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी केले. सुत्रसंचालन पुरवठा निरीक्षक कमलेश मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले यांनी मानले. कार्यक्रमास निरीक्षण अधिकारी गोंदिया सचिन काळे, निरीक्षण अधिकारी गोरेगाव अमित डोंगरे, सहायक लेखा अधिकारी सीमा वानखेडे, पुरवठा निरीक्षक लिना निमजे, पुरवठा निरीक्षक नितीन ढोमणे यांचेसह शहारवाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.