महसूलमंत्र्यांच्या विभागीय चौकशी आदेशाने तुमसर तालुका महसूल प्रशासनात खळबळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदीची रेती उच्च गुणवत्तेची आहे. या रेतीला मोठी मागणी असल्याने रेती तस्करांनी नवीन शक्कल लढवून तंत्रज्ञानालाही आव्हान दिले आहे. रेती वाहतुकी दरम्यान रेती घाटापासून रेती वाहतूक करणाºया वाहनाला जिओ टॅगिंग लावणे गरजेचे आहे. दुचाकीला जिओ टॅगिंग लावून ती महाराष्ट्राच्या सीमेत आणणे व त्यानंतर येथील ट्रक व टिप्परला हे जिओ टॅगिंग लावून नागपूर येथे रेती नेली जात आहे. हा प्रकार मागील कित्येक महिन्यापासून सुरू आहे. याबाबत राज्याच्या महसूलमंत्र्यांनी विभागीय चौकशीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्यानंतर महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे. रेती चोरी प्रकरणात कॉल रेकॉर्ड सीडीआर तपासणी होणार असल्याने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा लागून आहेत.

वैनगंगा व बावनथडी या दोन्ही नद्या दोन्ही राज्याच्या सीमेतून वाहतात. मध्यप्रदेशात रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. परंतु राज्याच्या सीमेतील रेती घाटांच्या लिलाव न करता शासकीय रेती डेपो सुरू करण्यात आले आहेत यामध्ये तालुक्यातील उमरवाडा, पांजरा (रेंगेपार), मांडवी, सोंड्या, चारगाव, लोभी, आष्टी या सात डेपोच्या समावेश आहे. मात्र उमरवाडा रेती डेपोला पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच तालुक्यातील इतर अनधिकृत रेती बावनथडी व वैनगंगा नदीपात्रातून उपसा सुरू आहे. रेती वाहतुकीकरिता रॉयल्टी अनिवार्य आहे. मध्यप्रदेशातील घाटावर जाण्याकरिता ट्रक व टिप्परला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे रेती तस्करांनी तुमसर तालुक्यातील रेती ट्रक व टिप्पर मध्ये भरणे सुरू केले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी सदानंद मोरे यांचे आदेश येथे धडकल्याने तुमसर तहसील कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अधिकारी व्यस्त दिसले. सध्या तुमसर शहरातून जाणाºया आंतरराज्य मार्गावर रेतीचे ट्रक व टिप्पर यांची वाहतूकनगण्य दिसली. रेतीच्या या खेळात आता कुणाचा बळी जाणार याची चर्चा तुमसर येथे सुरू आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत येथील महसूल प्रशासनाला १३ कोटींच्या महसूल जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते हे विशेष.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *