भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. महावितरणचे प्रकाशगड मुख्यालय हे आता सौरऊर्जेव्दारे प्रकाशमान झाले आहे. प्रकाशगड मुख्यालयाची दैनंदिन विजेची गरज भागविण्यासाठी २८० किलो वॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यात आली आहे. महावितरणकडून पर्यावरणपूरक सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. शेती सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी याकरिता मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.ड राबविण्यात येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकºयांना मोफत विजेसाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर सौर प्रकल्प उभारून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. राज्यातील १०० गावे सौरग्राम अर्थात १०० टक्के सौरउर्जेवर आणण्यासाठी सौरग्राम योजना राबविण्यात येत आहे. एकंदरीत हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून चालना देण्यात येत आहे. महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी संचालक अरविंद भादिकर (संचालन तथा मानव संसाधन), प्रसाद रेशमे (प्रकल्प), अनुदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर, प्रादेशिक संचालक परेश भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. कंत्राटदार में टेक फोर्स सर्व्हिसेस नागपूर यांनी या प्रकल्पाची उभारणी केली आहे.