भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : केंद्रीय मंत्रीमंडळाने २ कोटी घरकुले बांधण्यासाठी पुढील पाच वर्ष सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यानुषंगाने सन २०१८ मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादी मध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटूंबाचे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांकरीता स्वत:चे हक्काचे घर असणे हे एक दिव्य स्वप्नच असते. या दिव्य स्वप्नाची पूर्ती करुन घरकुलासाठी होणारी ओरड आता कायमची बंद करण्याकरीता केंद्र सरकारने ज्यांना घरकुल मिळाले नाही त्यांच्यासाठी ‘आवास प्लस २०२४ ’ हे अॅप जारी करुन या अॅपवर घरकुलासाठी सर्वेक्षणामध्ये माहिती भरा अन हक्काचे घरकुल मिळवा, असे आवाहन जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
ग्रामपंचायत अधिकाºयांमार्फत होणार सर्वेक्षणाचे कार्य : ‘आवास प्लस २०२४’ या अॅपवर कुटूंबाची माहिती भरण्याकरीता संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी सर्वेअर म्हणून काम करणार आहेत. तसेच स्वत: लाभार्थ्यांनाही स्वत:च्या मोबाईलवरुनही आपली माहिती अपलोड करता येईल. लाभाथ्यार्ला स्वत:ची माहिती भरतांना माहिती खरी व अचुक असल्याचे घोषणापत्र देणे आवश्यक असल्याची माहिती विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैशाली खोब्रागडे यांनी दिली. १ एप्रिल पासून होणार सुरुवात : आपल्याला घरकुल हवा असेल तर ‘आवास प्लस २०२४ ’ या अॅपवर जावून १ एप्रिल २०२५ पासून अर्ज करु शकता. त्याअर्जाची पंचायत समितीस्तरावर तसेच जिल्हास्तरावर छाननी केली जाईल. ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले आहे.