भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : चूलबंद नदी घाटातून बेकायदेशीर रीत्या रेत तस्करी करणाºया ट्रॅक्टरवर दिघोरी/मो. पोलिसांनी कारवाई करत ३.५३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली होती. गुरुवारी, (दि. २०) सकाळच्या सुमारास खोलमारा (जूना) येथील चूलबंद नदी घाटातून बेकायदेशीररित्या रॉयल्टीशिवाय रेत वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिघोरी/मो. पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार हितेश मडावी आणि त्यांच्या सहकाºयांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली. छाप्यादरम्यान विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून १ ब्रास रेत वाहतूक करताना आरोपीला पकडण्यात आले. कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर आणि रेत जप्त करून, आरोपी पवन शेंडे (२१) रा. तई ता. लाखांदूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत रेत तस्करीवर पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यामुळे अवैध रेत उत्खनन करणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. दिघोरी/मो. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.