भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नगर परिषद साकोली- सेंदुरवाफा हद्दीतील मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेला गती देत मुख्याधिकारी श्री. मंगेश वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली. प्रशासकीय अधिकारी श्री. गुंजन फेंडर व कु. कल्याणी भवरे व कर्मचारी आनंद रंगारी यांच्या चमू द्वारा थकीत मालमत्ता धारकांची दुकाने व गाळे सील करण्यात आले.
वित्त आयोगाचे अनुदान प्राप्त करण्यासाठी १००% मालमत्ता कर वसुली करण्याचे शासनाचे निर्देश असून, नगरपरिषद प्रशासन याबाबत कठोर भूमिका घेत आहे. याच अनुषंगाने, ३१ मार्च २०२५ पूर्वी सर्व मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा करावा, अन्यथा पुढील कठोर कार- वाईला सामोरे जावे लागेल, असे मुख्याधिकारी श्री. वासेकर यांनी स्पष्ट केले.नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिक व व्यावसायिकांनी ही संधी साधत कराचा वेळेत भरणा करावा आणि संभाव्य जप्तीची कारवाई टाळावी. आपल्या योगदानातून शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.