भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेरनारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत ३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. २० मार्चरोजी छत्तीसगड पोलिसांना बिजापूर-दंतेवाडा (बस्तर) जिल्ह्याच्या सीमाभागातील गंगलूर जंगल पारिसरात घातपात घडविण्याच्या उद्देश्याने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. यावरून जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले होते.
दरम्यान, जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात २६ नक्षलवादी ठार झाले. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला. तर दुसरी चकमक कांकेरनारायणपूर (अबुझमाड) जिल्ह्याच्या सीमाभागात उडाली. यात ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यातसुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे छत्तीसगड पोलिसांचे म्हणणे आहे. या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये सुमारे १०५ नक्षलवादी मारले गेले आहेत. ज्यामध्ये बस्तर भागातील ६९ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. तसेच या मोहिमांदरम्यान एकूण १३ जवान आणि १६ नागरिकांचाही मृत्यू झाला.