भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) ऊर्जा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल शुक्रवारी नवी दिल्ली येथे पुरस्कार देण्यात आला. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते. लोकेश चंद्र म्हणाले की, आपल्याला मिळालेला पुरस्कार आपण नम्रतेने स्वीकारत असून याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी केलेल्या नेतृत्वाला आहे. तसेच आपल्याला सहकार्य करणाºया महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांचा आपण आभारी आहोत.
लोकेश चंद्र यांनी जून २०२३ मध्ये महा- वितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर वीज ग्राहक केंद्रबिंदू मानून महावितरणच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. तसेच त्यांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला आणि राज्याची आगामी काळाची गरज ध्यानात घेऊन ऊर्जा परिवर्तन आराखडा राबविण्यास प्राधान्य दिले. शेतकºयांना कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने महत्त्वाचे योगदान दिले आहे. या योजनेमुळे आगामी वर्षात राज्यातील सर्व कृषी पंपांना सौर उजेर्चा पुरवठा करता येईल. महावितरणने वीज खरेदी करारात अपारंपरिक ऊर्जेवर भर दिल्यामुळे आगामी पाच वर्षात कंपनीचे वीज खरेदीचे एक लाख ३० हजार कोटी रुपये वाचणार असून त्यामुळेच महावितरणने पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीजदर कमी करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. भविष्यात राज्याची विजेची गरज किती वाढेल व ती कशी पूर्ण करायची याचा सविस्तर रिसोर्स अॅडेक्वसी प्लॅन महा- वितरणने तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे २०३० पर्यंत राज्याची ५२ टक्के विजेची गरज ही अक्षय्य ऊर्जेच्या आधारे पूर्ण होईल. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात शेतकरी व घरगुती ग्राहकांना रिन्युएबल एनर्जीचा अधिकाधिक उपयोग होण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात महावितरणने आघाडी घेतली आहे.
सौर ग्राम योजनेच्या अंतर्गत गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण करतानाच त्यांना वीजबिलातून मुक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक पाणी पुरवठा योजना आणि पथदिवे सौर ऊर्जेवर चालविण्यासाठीच्या योजनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरण आघाडीवर असून आतापर्यंत १ लाख १४ हजार ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. लोकेश चंद्र हे आयआयटी दिल्लीचे स्थापत्य अभियांत्रिकेचे पदवीधर आहेत. तसेच त्यांनी एम. टेक पदवी प्राप्त केली आहे. ते १९९३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. महावितरणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयात संचालक व पोलाद मंत्रालयात सहसचिव म्हणूनही काम केले आहे.