नागपुरात दंगलखोरांवर ‘यूपी स्टाईल’ कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सोमवारी महाल, हंसापुरीत झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खानला पोलिसांनंतर आता प्रशासनाकडून मोठा धक्का देण्यात येणार आहे. यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली आहे. मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावली असून सोमवारी अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडण्याची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर नागपुरात देखील आता गुन्हेगारांवर ‘बुलडोझर’ने वचक बसविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे अशीच चर्चा आहे. सोमवारी महाल, हंसापुरी परिसरात झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या घटनेनंतर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानला अटक करण्यात आली होती.

औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्यावरून रविवारी सकाळच्या सुमारास महालच्या शिवाजी पुतळा परिसरात आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर फहीम खानने षडयंत्र रचून जमावाच्या भावना भडकाविल्या व त्यातून जाळपोळ सुरू झाल्याच्या त्याच्यावर ठपका आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खानबाबत पोलिसांकडून विविध माध्यमांतून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, त्याच्या घरात जवळपास ९०० चौरस फुटांचे बांधकाम अनधिकृत असल्याची बाब समोर आली. नागपूर महानगर पालिकेने त्याला तत्काळ नोटीस बजावली व त्याच्या घरीदेखील एक प्रत दिली. हे अतिक्रमण तातडीनेपाडण्याची कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आले असून सोमवारीच ही कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *