भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : अंगणवाडी केंद्रात सेविका व मदतनिस पदी स्थानिकांना नियुक्ती देण्याच्या मागणीला घेऊन गावकºयांनी थेट अंगणवाडी केंद्रावरच बहिष्कार घातल्याचा प्रकार तालुक्यातील पाटीलटोला (आसोली) येथे पुढे आला आहे. गावकºयांच्या या बहिष्कारामुळे गेल्या दिड महिन्यांपासून पालक आपल्या पाल्यांना अंगणवाडीत पाठवत नसल्याने येथील अंगणवाडी केंद्र ओसाड पडून आहे. आसोली ग्रामपंचायत अंतर्गत पाटीलटोला हे गाव येत असून येथील लोकसंख्या जवळपास दोनशेच्या वर आहे. त्याचबरोबर हे गाव ९० टक्के आदिवासीबहूल आहे.
आदिवासीबहुल गाव असल्याने या केंद्रात साहजिकच सर्व विद्यार्थी आदिवासी समाजाचे आहेत. असे असताना संबंधित विभागाकडून केंद्रापासून दिड किमी अंतरावरील आसोली येथील महिलांची या केद्रांत सेविका व मदतनीस पदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, सर्व मुले आदिवासी समाजातील असल्याने त्यांच्याशी त्यांच्या स्थानिक भाषेत संवाद साधण्यासाठी आदिवासी समाजातील महिलांची सेविका व मदतनिस पदी नियुक्ती करावी अशी मागणी येथील गावकºयांची आहे. परंतू संबंधित विभागाकडून त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गावकºयांनी अंगणवाडीवर बहिष्कार टाकत आपल्या पाल्यांना पाठविणे बंद केले आहे. या प्रकाराला दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरीदेखील प्रशासनाकडून या गंभीर बाबीची दखल घेण्यात आली नाही. परिणामी पालकांसह नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.